नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उन्हाळी तीळ,उडीद, मूग लागवड व्यवस्थापन कसे करायचे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याची पूर्वमशागत, आंतरमशागत, लागवड कधी करतात, लागवड पेरणी कशी करायची, कोणत्या जातीचं बियाणे वापरावेत, पाणी व्यवस्थापन कसे करावे यासंबंधित माहिती घेणार आहोत. जर आत्ताच्या उन्हळ्यात तुम्ही तीळ, उडीद आणि मूग यांची पेरणी करण्याचा विचार करत आहेत तर हे आर्टिकल तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे.
उडीद-मूग, तीळ लागवडीसाठी पूर्वमशागत –
आधीचे पीक निघाल्यानंतर जमीन भुसभुशीत करून घ्यावी, म्हणजेच वखरणी करून घ्यावी. त्यानंतर हेक्टरी १०-१५ गाड्या शेणखत शेतात विस्कटावे आणि एक कुळवाच्या पाळी देऊन उडीद- मूग पेरणीसाठी जमीन तयार करावी. त्याचप्रमाणे तिळाचे बी आकाराने खूपच लहान असल्याने जमीन चांगली भुसभुशीत असणे गरजेचे आहे, त्यासाठी जमिनीतील काडी कचरा वेचून काढावे आणि उभी आडवी वखरणी करून घ्यावी. आणि चांगकले कुजून गेलेले शेणखत टाकून, जमीन सपाट करून घ्यावी.
उन्हाळी तीळ, उडीद, मूग पेरणी कधी करावी?
मित्रांनो, उन्हाळी मूग-उडीद लागवड १५ मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात करून घ्यावी. १५ मार्चनंतर पेरणी केल्यास काढणीच्या वेळी येणाऱ्या पावसामुळे पिकाचे नुकसान संभवते.तर तीळ पिकाची पेरणी ही फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.
कोणत्या जातींचे बियाणे उन्हाळी हंगामासाठी वापरावेत?
उडीद पिकासाठी टी-९ किंवा पी.डी.यू.-१ या जातीचे बियाणे उन्हाळी हंगामासाठी योग्य असेल.
तर मूग पिकासाठी पी.डी.एम.-१, पुसा-९५३१ किंवा पुसा वैशाखी या जातीचे बियाणे वापरावीत. आणि तीळ पिकासाठी एकेटी-१०१ आणि एनटी ११-९१ या जातीच्या बियाण्याची उन्हाळी हंगामासाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे.
प्रति हेक्टरी किती बियाणे पेरावे?
उडीद मूग पेरणी करते वेळी दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. तर दोन झाडांतील अंतर १० सें.मी. एवढे राखून पेरणी करावी. पेरणीच्या पूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करून घ्यावी. त्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होतो. आणि पीक अधिक चांगल्या रीतीने येण्यास मदत होते. पीक तणविरहित ठेवावे. जेणेकरून पिकाची वाढ उत्तम रीतीने होण्यास मदत होईल.
उन्हाळी हंगामाकरिता तीळ पिकासाठी प्रति हेक्टरी ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास ३ग्रॅम कार्बेन्डाझिम तसेच चार ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो याप्रमाणे बियाणाला लावून घ्यावे . असे केल्यामुळे जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांना आळा बसतो, तसेच बियाण्याची उत्तम रीतीने उगवण होते. पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक आणि त्यानंतर पुढच्या आठ दिवसांनी दुसरी विरळणी अश्या रीतीने करावी कि दोन रोपांत दहा सें.मी. अंतर असले पाहिजे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत ताणविरहित राहील याची दक्षता घ्यावी, जेणेकरून रोपांची वाढ उत्तम रीतीने होईल.
खत व्यवस्थापन कसे करावे?
उडीद मूग पीकासाठी खत व्यवस्थापन-
उडीद-मूग पिकास माती परीक्षणानुसार प्रतिहेक्टरी २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होण्यास मदत होईल . नत्र व स्फुरद या दोन्ही अन्नद्रव्यांची संपूर्ण मात्रा पेरणीच्याच वेळी द्यावी.
तीळ पीकासाठी खत व्यवस्थापन-
पेरणीच्या वेळेस प्रति हेक्टरी १२.५ किलो नत्र आणि २५ किलो स्फुरद द्यावे. त्यानंतरचा १२.५ किलोचा नत्राचा दुसरा हप्ता हा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावा. कमतरता असल्यास पेरणीच्या वेळेस तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार झिंक व सल्फरच्या मात्रा २० किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात द्याव्यात. पेरणीनंतर ७-८ दिवसांनी नांगे भरून घ्यावेत.
ओलीत व्यवस्थापन कसे करावे?
तीळ ओलीत व्यवस्थापन-
तीळ उन्हाळी पिकास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतरलगेच व नंतर तुमच्या जमिनीप्रमाणे १२-१५ दिवसांनी ओलित करावे. त्यानंतर फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास पाणी द्यावे.
उडीद- मूग ओलीत व्यवस्थापन-
उडीद- मूग उन्हाळी पिकास पहिली पाळी पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी म्हणजेच विरळणीचे काम पूर्ण झाल्यावर द्यावी.त्यानंतर गरजेनुसार या पिकाला ५ ते ६ पाळ्या द्याव्यात. म्हणजे पीक अधिक उत्पादन देणारे येण्यास मदत होईल.
तर मग शेतकरी मित्रांनो, आत्ताची उन्हाळी उडीद- मूग आणि तीळ पेरणी अश्याच पद्धतीने करा. नक्कीच तुमच्या त्याचे भरगोस उत्पादन मिळेल. आणि तुमचे आधीच्या पद्धतीपेक्ष्या जास्त उत्पादन नक्कीच निघेल. तुम्हला हि माहिती कशी वाटली, हे नक्कीच तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा.
- Ah Mahabms नाविन्यपूर्ण योजना 2024 अर्ज : गाई /म्हशी वाटप योजना
- Karnataka Gruha Lakshmi Scheme 2024 ऑनलाइन आवेदन शुरू Online Application Form
- पीएम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना संपूर्ण माहिती
- विश्वकर्मा शिलाई मशीन योजना प्रशिक्षणाचा कॉल किती दिवसांनी येतो?
- Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती